बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय
कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व थांबून गेलं. पण या कोरोनाच्या महामारीत बळीराजा थांबला नाही. कुठेही आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता उभ्या जगाचे पोट आपल्या भरोश्यावर आहे. हा विचार मनात घेऊन शेतकरी कष्ट करतोय. शेतात पिकलेलं सोनं कवडीमोल भावात देऊन, खंबीरपणे उभा आहे. 40 ते 50 वर्षापूर्वी शेती हा व्यवसाय थोड्या वेगळ्या पद्धतीने केला जात होता. शेतातून मिळालेले उत्पन्न आपल्या कुटूंबाचे पोट भरेल एवढे धान्य ठेऊन मग उरलेल्या अन्नधान्याची विक्री केली जात होती.
कोरोनामुळे जग थांबलयं. पण शेतकरी थांबला नाही. कश्यासाठी तर फक्त जगासाठी.शेतकऱ्यांना भीती वाटत नसेल का? घरात आपल्याला पुरेल इतकं अन्नधान्य असून सुद्धा का राबतोय? सर्व देश जरी थांबला असेल पण शेतकरी थांबला तर सगळ्यांवर उपासमारीची वेळ येईल, हा विचार बळीराजाला शांत बसू देत नसावा. लॉकडॉऊनच्या काळात सगळ्यांनी चैनीच्या गोष्टी घेणं बंद केलं असेल पण अन्नाशिवाय कोणीच जगू शकत नाही. अन्न ही सर्वांची मूलभूत गरज आहे. पण याच बळीराजाला आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
एका वयोवृद्ध शेकऱ्यांच्या मते शेती व्यवसाय सोपा नाही पण अवघड देखील नाही. निसर्गाची मिळालेली योग्य साथ बळीराजाला सुखी ठेवते. हवामान व्यवस्थित असले की पिकं चांगली येतात आणि पिकं चांगली आली की त्यात समाधान मानत बळीराजाला कोणापुढे हात पसरण्याची गरज पडत नाही. पण सद्यस्थितीत निसर्गाचा प्रकोपच म्हणावा लागेल. हाताशी आलेली पिकं हातात येण्याआधीच गारपिटीचा सामना करावा लागतोय. कुठेतरी निसर्गाने शेतकऱ्यांना खूप साऱ्या वरदान दिल्या की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.वर्षभरात नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई, वीज, गारपीट, महापूर, योग्य वेळी पाऊस न पडणे, रोगराई अशा कितीतरी समस्यांना तोंड देत शेती करणं ही खूप धैर्याची गोष्ट म्हणावी लागेल.
कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाली तशी बळीराजाच्या समस्यांमध्ये देखील भर पडत राहिली. मागील वर्षी पाऊस चांगला असूनही आलेलं पीक हे बाजारात विकता आलं नाही. सद्यस्थितीत होत असलेल्या गारपिटीमुळे जे पीक हाताशी होतं ते देखील भुईसपाट झालय. झी 24 तासच्या बातमीनुसार बुलढाणा शहरामध्ये 75% शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद झाली आणि शेतीमालाला देखील मंदी आली. दुष्काळ, अवकाळी आणि कोरोना यामुळे शेतकरी हवालदिल झाला. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच शेकऱ्यांनी भाजीपाला फुकट वाटला. अनेक फळबागायत शेतकऱ्यांनी पिकं शेतातच फेकून दिली. उभ्या पिकात जनावरं सोडली. काबाडकष्ट करून पिकवलेलं सोनं हे डोळ्यासमोर मातीमोल झालं.
बळीराजाला खरं तर कोरोना योद्धाच म्हणावं लागेल. आपलं पोट भरत असताना जगाच्या पोटाची काळजी करणं काही सोपी गोष्ट नाही. म्हणून बळीराजाला कोरोना योद्धाच म्हणावं लागेल. पण दुर्दैव या सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे भान राहत नाही. सत्ताधाऱ्यांच्या पोकळ भाषणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. बळीराजाच्या बांदावर जाऊन त्याचे प्रश्न समजावून घेऊन ते सुटू शकतात.
![]() |
मराठीमध्ये एक म्हण आहे 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' पण इथं शेतीशी काही संबंध नसलेल्या लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोललेलंच बरं. याचा शेकऱ्यांना काही एक फायदा होणार नाही. या देशातील बळीराजा जगला तरच देशाचं आर्थिक गणित बिघडणार नाही याचा सरकारला विसर पडतोय की काय कसा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतोय.
काही वर्षापूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण सर्रास वापरली जायची. शेती व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मग काय चुकले असेल त्या जगाच्या पोशिंद्याचे. शेतीवर सर्व जग अवलंबून असूनसुद्धा बळीराजा सुखी का नाही. का न्याय मिळत नसावा बळीराजाला असे कितीतरी प्रश्न सरकारच्या कचेरीत धूळ खात पडत आहे. शेतीत पिकवलेलं अन्नच सर्वजण खातात मग बळीराजाच्याच प्रश्नावर का उत्तर मिळत नाही. या सत्ताधाऱ्यांनी शेतीसोडून अन्नधान्यासाठी दुसरा कोणता पर्याय विचारात घेतला नसेल ना? हा प्रश्न शेकऱ्यांना पडू लागला आहे.
-- केतन कोलते ( पत्रकार )