*सिनेसृष्टीने गमावले 'हे' 21 हिरे*
2020 मधील सहा महिने उलटले. ‘कोरोना’चे सावट पूर्ण देशावर असताना मनोरंजन विश्वातूनही अनेक धक्कादायक बातम्या आल्या. या काळात सुशांत, ऋषी कपूर, इरफान खान, सैय्यद जाफरी अशा अभिनेत्यांचे झालेले निधन चटका लावणारे होते, तर सुशांतसिंह राजपूत, मनमीत ग्रेवाल अशा उदयोन्मुख कलाकारांनी केलेल्या आत्महत्यांनी सर्वसामान्य प्रेक्षकही हेलावले.
1) सैय्यद जाफरी (जगदीप)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांचे वयाच्या ८१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले.
2. सुशांतसिंह राजपूत
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांसाठी हा मोठा धक्का आहे. पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
3. इरफान खान
हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याची एक्झिट धक्कादायक होती. 29 एप्रिलला त्याचे निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते, मात्र हा तर अकाली निखळेल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती.
4. ऋषी कपूर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची कर्करोगाशी लढाई अपयशी ठरली. 30 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून प्रेक्षक सावरत नाहीत, तोच दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची दुर्दैवी वार्ता कानी आली होती.
5. चिरंजीवी सर्जा
कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याची पत्नी, अभिनेत्री मेघना राज गर्भवती असल्याने चाहत्यांचे काळीज तीळतीळ तुटत आहे.
6. वाजिद खान
संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांची जोडीही या वर्षी फुटली. 1 जून रोजी वयाच्या 47 व्या वर्षी वाजिद खान याचा हृदयविकाराचा धक्का बसल्याने करुण अंत झाला.
7. रत्नाकर मतकरी
ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.
8. प्रेक्षा मेहता
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने मे महिन्यात आत्महत्या केली. ती फक्त 25 वर्षांची होती.
9. सेजल शर्मा
‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्मा हिनेही जानेवारी महिन्यात आत्महत्या केली.
10. मनमीत ग्रेवाल
‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीप’ अशा मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता मनमीत ग्रेवाल याने मार्चमध्ये आत्महत्या केली. तो अवघ्या 32 वर्षांचा होता.
11. सचिन कुमार
‘कहानी घर घर की’मध्ये अभिनय केलेले अभिनेते सचिन कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मे महिन्यात निधन झाले.
12. साई गुंडेवार
‘रॉक ऑन!!’, ‘पीके’ आणि ‘बाजार’ या सारख्या चित्रपटात भूमिका केलेला मराठमोळा अभिनेता साई गुंडेवार याचे मे महिन्यात निधन झाले. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. तो 42 वर्षांचा होता.
13. शफीक अन्सारी
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेते शफीक अन्सारी यांचे 10 मे रोजी निधन झाले. कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
14. जगेश मुकाटी
‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये दिसलेले लोकप्रिय अभिनेते जगेश मुकाती यांचे जूनमध्ये निधन झाले. श्वासोच्छवास करण्यास त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
15. योगेश गौर
प्रख्यात गीतकार योगेश गौर यांचे मे महिन्यात वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. ‘जिंदगी कैसी ये पहेली’ आणि ‘कभी दूर जब दिन ढल जाए’ अशी प्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिली.
16. अन्वर सागर
‘वादा रहा सनम’ आणि ‘ये दुआ है मेरी रब से’ सारखी गाणी लिहिणारे गीतकार अन्वर सागर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.
17. मोहित बघेल
सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटात झळकलेला अभिनेता मोहित बघेल मे महिन्यात काळाच्या पडद्याआड गेला. मोहितला कॅन्सर असल्याची माहिती आहे.
18. बासु चटर्जी
प्रख्यात चित्रपट निर्माते बासु चटर्जी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. ‘छोटीसी बात’ आणि ‘चमेली की शादी’ अशा हलक्याफुलक्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.
19. अनिल सुरी
बॉलिवूड निर्माते अनिल सुरी यांनी जून महिन्यात जगाचा निरोप घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
20. इम्तियाज खान
हिंदी चित्रपट अभिनेते इम्तियाज खान यांनी मार्चमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते अभिनेते अमजद खान यांचे बंधू. त्यांनी ‘यादों की बरात’ आणि ‘नूरजहां’ सारख्या चित्रपटात काम केले होते.
21. निम्मी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank u so much