अभिनयाच्या दादाची आज जयंती
आज दादा कोंडके यांचा आज वाढदिवस. सगळ्याचा हृदयात स्थान निर्माण केलेल्या दादांना विसरणे कठीणच !
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती.
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.
दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या..... नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.
कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खणखणपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... ' चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.
१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्ऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनरखाली केला.